दापोली : तालुक्यातील वणौशी खोतवाडीत दोन सवती आणि अन्य एक महिला अशा तिघींचा संशयास्पद मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) तसेच इंदुबाई शांताराम पाटणे (८०) अशी या तिघींची नावे आहेत. त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.दापाेली पाेलिसांनी याबाबत चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डाेक्यात प्रहार करुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद हे करत आहेत.पार्वती आणि सत्यवती या सवती होत्या. इंदुबाई या त्यांच्या जाऊ शेजारच्या घरात राहत होत्या. या तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी एकत्र झोपल्या. परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार उघड झाला. हा प्रकार नेमका रात्री घडला की, सकाळी घडला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघींनाही मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या त्यांचा सांभाळ करत होता. शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्याही घरी एकट्या असत. त्यामुळे त्या झोपण्यासाठी पार्वती, सत्यवतीकडे जात असत. तीन महिलांचा एकाच ठिकाणी खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पाेलीस तपास सुरु आहे.
दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 4:58 PM