अरुण आडिवरेकर ।रत्नागिरी : नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी अनेकजण धार्मिक विधीला प्राधान्य देतात. मात्र, धार्मिक विधी, कर्मकांड बाजूला ठेवून खेड येथील संदीप बडबे यांनी संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला संविधानाची प्रत वाचून गृहप्रवेश केला. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे, जात, धर्म यात आपण सर्वजण अडकलो असून, सर्वांना समानतेची वागणूक देण्यासाठी संविधान महत्त्वाचे असल्याचे संदीप बडबे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.खेड येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे वैज्ञानिक जाणीव प्रमुख संदीप बडबे यांनी खेड रेल्वेस्थानकनजीक एका इमारतीत सदनिका घेतली आहे. या सदनिकेचा गृह प्रवेश २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, कोणताही धार्मिक विधी न करता त्यांनी संविधान प्रास्ताविका वाचून गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन असल्याने या गृह प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.संदीप बडबे यांनी सांगितले की, केवळ पोट भरण्यासाठी कर्मकांड किंवा धार्मिक विधींचा आधार घेतला जातो. त्याऐवजी संविधानाची प्रत वाचून गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सकाळी दरवाजाबाहेर उभे राहून संविधानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर दरवाजावर बांधण्यात आलेली फीत कापून घरात प्रवेश करण्यात आला. घरात छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले होते. या फोटोंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला अंनिसचे जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदीप गोवळकर, कार्याध्यक्ष रेश्मा कांबळे, सचिव सचिन शिर्के, हेदली गावचे उपसरपंच संजय गोवळकर, जय हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक मेंगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
संविधानाने समानता दिलेली आहे. संविधानामुळे समान हक्क मिळालेले आहेत. प्रत्येकाने आपल्या घरापासून याची सुरूवात केली पाहिजे. तरच ही चळवळ पुढे सुरू राहिल.- संदीप बडबेदेशातील सर्व घटकांना एकमार्गाने नेणारा मार्ग म्हणजे संविधान आहे. आपण जात, धर्मात अडकलो आहोत. सर्वांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी संविधानाचा स्वीकार केला पाहिजे. त्यात कोणतीही जात, धर्म राहत नाही. संदीप बडबे हे संविधानप्रेमी आहेत. सर्व धार्मिक रुढी, परंपरा धुडकावून त्यांनी संविधानची प्रस्ताविका वाचून गृह प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. हाच आदर्श घेऊन सर्वांनीच पुढे जाण्याची गरज आहे.- संदीप गोवळकर,संघर्ष प्रमुख, अंनिस जिल्हा बुवाबाजी