दापोली : तालुक्यातील मुरुड येथे आज सोमवारी सायंकाळी एका अपघातात केवळ आठ महिन्यांच्या बालिकेचा दुर्दैवी अंत झाला. गाडी मागे घेतली जात असताना एका पर्यटक महिलेला धक्का लागला आणि ती आपल्या महिन्याच्या मुलीसह खाली पडली. हे कुटुंब पुणे येथून दापोलीत फिरण्यासाठी आले होते. अवनी अतुल बनसोडे असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.पुणे येथील केशवनगर (मुंढवा ) येथील सुजाता अतुल बनसोडे या आपली मुलगी अवनी (८ महिने) हिच्यासह काल रविवारी सायंकाळी ६ वाजता पुणे येथून शिवशाही गाडीने दापोली येथे आल्या. त्यांचे पती दुचाकीने अगोदरच आले होते. तिघेही दुचाकीने प्रथम पर्यटनासाठी लाडघर येथे गेले. आज सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मुरुड येथे दुचाकीने आले. तेथील एका रिसोर्टमध्ये ते राहिले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरूनच मुरूड समुद्रकिनारी गेले.अतुल बनसोडे यांना कार्यालयातील मित्राचा फोन आल्याने ते बाजूला गेले. अवनी आपल्या आईकडे म्हणजेच सुजाता यांच्या हातात होती. तेवढ्यात एक स्कॉर्पिओ मागे येत होती व तिचा धक्का सुजाता यांना लागला. त्यामुळे सुजाता व अवनी खाली पडले. स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाचा धक्का अवनीला लागला व ती जखमी झाली. याच गाडीतून अवनीला प्रथम आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले व त्यानंतर तिला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अवनीची प्राणज्योत मालवली असल्याचे जाहीर केले.
मुरूडला अपघातात बालिकेचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 9:41 PM