मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या माध्यमातून ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत ‘कोरोनामुक्त माझे शहर सर्वेक्षण’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नगर पंचायतीचे कर्मचारी, आशासेविका व जिल्हा परिषदेचे शिक्षक शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत.
नागरिकांची ऑक्सिजन पातळी, त्यांचे शारीरिक तापमान व पल्स यांची नोंद घेत आहेत. शहरातील ३५०० नागरिकांची या मोहिमेत तपासणी करण्यात आली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विनोद डौले यांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेचा दररोज आढावा घेत आहेत. याशिवाय मुख्याधिकारी विनोद डौले यांनी या कालावधीत शहरातील प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक प्रभागाचे सॅनिटायझेशन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील सर्वच सार्वजनिक ठिकाणेही सॅनिटाइझ करण्यात आली आहेत.
याशिवाय मुख्याधिकारी व नगर पंचायत कर्मचारी शहराचे बाजारपेठेत व मुख्य ठिकाणी उभे राहून नागरिकांना लॉकडाऊनमधील कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. मास्क सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम, बाजारपेठेत खरेदीकरिता आलेल्या नागरिकांनी पाळावेत यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. शहरातील जीवनावश्यक वस्तू व सेवांची दुकाने निर्देशित वेळेत सुरू करून वेळेवर बंद करावीत. याकरिता नगर पंचायतीने दुकानदारांमध्ये जागृती केली आहे. वेळेनंतर विनाकारण सुरू असलेल्या व नियमबाह्य खुल्या असलेल्या दुकानाविरोधात नगर पंचायतीने दंडात्मक कारवाईची मोहीमही राबवली आहे.