रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील वाढत जाणारी कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता, जिल्ह्यात ‘माझा डॉक्टर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत या डॉक्टरांनी विनापरवानगी कोविड रूग्णांवर उपचार न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात वाढत जाणारी कोरोना संक्रमित रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात ‘माझा डॉक्टर’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी व्यवसाय करणाऱ्या डाॅक्टर्सनी कोविड रुग्णांना उपचार करण्यापूर्वी https://forms.gle/HsdbyqmMfpGdBAgs5 या लिंकवर अर्ज करून परवानगी मिळवणे आवश्यक आहे. परवानगीविना कोविड रुग्णांवर उपचार करु नयेत. कोविडच्या साथीवर मात करण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडून हे फाॅर्म उपलब्ध करून घ्यावेत. त्यांची वैद्यकीय, शैक्षणिक अर्हता पाहून त्यांना कोविड संक्रमित व संशयित रूग्णांवर उपचार करण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.