दापोली (जि. रत्नागिरी) : कोकणातील माणूस सुसंस्कृत आहे, बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान माणसाला शांतता हवी असते. त्यासाठीच आपला लढा आहे. आपला लढा हा नारायण राणे यांच्याविरोधात नाही, तर त्या प्रवृत्तीविरोधात आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केले.येथील कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केसरकर यांनी राणे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, राणेचे आपण वाईट चिंतत नाही. परंतु ज्या कोकणची शांत-संयमी अशी संस्कृती आहे. अशा कोकणातील चांगल्या संस्कृतीला वाईट व दुष्ट संस्कृती बिघडवत असेल तर तिचे समूळ उच्चाटन व्हायला हवे. कोकणच्या जनतेला ‘राणे संस्कृती’ नको आहे. म्हणूनच कोकणच्या जनतेने एक नव्हे दोनदा त्यांना नाकारले आता तिसºयांदा काय होईल सांगता येत नाही. भाजपानेही तिकीट नाकारुन राणे संस्कृतीला नाकारले आहे.भाजपाने राणे यांना पक्षप्रवेश देतो असे सांगून स्वतंत्र पक्ष काढायला सांगितले. त्यांनी स्वाभिमान पक्ष काढला. राज्य मंत्रीमंडळात आपला समावेश सहज होईल असे वाटणाºया राणेंना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारीही दिली नाही. त्यामुळे राणेंचे काय होईल सांगता येत नाही. विधानपरिषदेसाठी राणे उमेदवार नसल्यामुळे आता भाजप व शिवसेना एकत्र असतील, असेही केसरकर म्हणाले.
माझा लढा कोकणातील शांततेसाठी - केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 5:46 AM