देवरुख : आपल्या गावी जात असताना रेल्वेतून ताेल जाऊन पडल्याने माय-लेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वरजवळच्या आंबेडखुर्द येथील बाेगद्यात घडली. शुक्रवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली असून, गाडीत गर्दी असल्याने ताेल जाऊन त्या खाली पडल्याचे पाेलिसांनी सांगितले.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता भजनलाल (४१) आणि रमा भजनलाल (२०, दाेघी रा. पेतखेडा, उत्तर प्रदेश) या शुक्रवारी मंगला एक्स्प्रेसमधून रत्नागिरीहून सकाळच्या दरम्यान राजस्थान या मूळ गावी निघाल्या होत्या. रेल्वेच्या दिव्यांग डब्यात त्या बसल्या होत्या. मात्र, गर्दी असल्याने तोल जाऊन त्या पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद तेजवीर भजनलाल कुमार यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली आहे.
सध्या त्या रत्नागिरी येथील मुरुगवाड पांढरा समुद्र येथे राहत होत्या. संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही. व्ही. कोष्टी करत आहेत.