राजापूर : रिफायनरीच्या दलालांनी अपुरी माहिती देऊन माझी दिशाभूल केली. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प बारसू येथे उभारण्यासंदर्भातील पत्र आपण केंद्र सरकारला धाडले, असे मत ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राजापूर तालुक्यातील बारसू येथे व्यक्त केले.रिफायनरी प्रकल्प प्रस्ताविक असलेल्या बारसू, सोलगावला शनिवारी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेले पत्र आणि त्यामागची आपली भूमिका यावरच भर दिला. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री अनिल परब, रवींद्र वायकर, पक्षाचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे शिवसेना ग्रामस्थांसोबतच आहे आणि जर बारसूतील ग्रामस्थांना रिफायनरी नको असेल तर या प्रकल्पाला ठाकरे शिवसेनाही ठाम विरोध करेल, असे ते म्हणाले.बारसू येथे माती परीक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी विरोध सुरू केला. तेव्हा सत्तेतील शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र समोर आणले आणि बारसूतील जागा उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला सुचवली असल्याचे ठामपणे सांगितले. केवळ याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या दौऱ्यात विशेष भर दिला. बारसू भागातील जागेत काहीच पीक घेतले जात नाही. प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जागेत कोणी राहतही नाही, असे आपल्याला रिफायनरीच्या दलालांनी सांगितले. त्यामुळे आपण केंद्र सरकारला रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा सुचवणारे पत्र दिले.अर्थात लोकांची डोकी फोडून प्रकल्प राबवा, असे आपण सांगितलेले नाही. लोकांची मते विचारात घेऊनच प्रकल्प राबवायला हवा. जर लोकांना हा प्रकल्प नको असेल तर त्याला ठाकरे शिवसेनेचाही ठाम विरोध असेल, असे त्यांनी सांगितले.आपण बारसूच्या जागेसंदर्भात पत्र दिले. पण त्यात आपल्याला अपुरी माहिती देण्यात आली होती. आपला हेतू चांगला होता. म्हणूनच आपण लोकांसमोर ठामपणे उभे राहून आपली भूमिका मांडत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले आणि सध्याच्या सरकारने हा प्रकल्प कसा चांगला आहे, हे मी जसा लोकांमध्ये उभा राहून बोलत आहे, असे बोलून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.
रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण
By मनोज मुळ्ये | Published: May 06, 2023 6:48 PM