- मेहरून नाकाडे (रत्नागिरी)
कोणतीही रासायनिक खते, किंवा कीटकनाशकांचा वापर न करता शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या खानू गावाला महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून २०१६-१७ मध्ये गौरविण्यात आले. गावामध्ये घर तेथे शोषखड्डा असून गावाने तयार केलेल्या शोषखड्ड्याचे मॉडेल जिल्हा व जिल्हाबाहेरील गावागावातून वापरण्यात येत आहे. आता ग्रामसभेत ठराव करून ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे.
गावामध्ये २८ बचतगट आहेत. या बचतगटांची विविध उत्पादने आहेत. मात्र, ‘खानू खजाना’ या एकाच ब्रँडनेमने त्याची विक्री सुरू आहे, हे विशेष! गावातील शंभर एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. लाल, काळ्या भाताचे बियाणेही तयार करून विक्री करण्यात येते. लाल तांदळामध्ये सोनफळ, मूडगा, तूर्ये, सरवट या प्राचीन लुप्त होत चाललेल्या वाणांचे जतन करण्यात आले. काळ्या तांदळात गोविंद भोग व काळबायो (स्थानिक वाण) लावण्यात येत आहे. यापुढे सेंद्रिय खतासाठी गावाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. खानू गावात ४३५ घरे असून, घरोघरी शोषखड्डा बनविण्यात आला.
यावर्षी ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण योजनेंतर्गत कंपोस्टचे शंभर टक्के प्रस्ताव तयार करण्यात आले असून, ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून संमत करण्यात आला. घराशेजारी किंवा शेतात ग्रामस्थांनी कंपोस्ट युनिट बांधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय खतासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरातील ओला, सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी इको फ्रेंडली फार्मस गटाचे प्रमुख व शेतीतज्ज्ञ संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
गावामध्ये जैवविविधता समिती असून, वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी आहे. गावचे सरपंच, उपसरपंच याबरोबर सर्व ग्रामस्थांची एकजूट हेच गावच्या विकासाचे द्योतक म्हणावे लागेल. खानू गावचे क्षेत्र ९९९.९१.५९ हेक्टर असून, लोकसंख्या १८६६ आहे. पुरुष संख्या ९०२ ते ९६४ स्त्रियांची संख्या आहे. मुख्य पीक काजू, आंबा, भात, नागली, नारळ आहे. गावामध्ये ५११ गाई असून ६४ म्हशी आहेत. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे रासायनिक खते, कीटकनाशके विक्री शंभर टक्के बंद असून शेतकरी बाहेरूनही रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करीत नाहीत. फळबाग लागवड योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये गावात ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. त्यासाठी ५० लाख १३ हजार ४५५ खर्च झाला. कृषी अधिकारी टी.एन. शिगवण यांचे सहकार्य लाभले. खानूत एकही क्षयरुग्ण, कुष्ठरोग रुग्ण नाही. खानू प्रा.आ. केंद्राला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर झाला, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रेवंडेकर यांनी दिली.