फोटो ओळी- मंडणगड नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहरातील निवळी नदीवर वनराई बंधारा बांधला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन, मंडणगड नगरपंचायत स्वच्छता समिती व पाणी समितीच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील निवळीनदीवर मातीचा बंधारा उभा केला आहे. त्यामुळे परिसरात पाणी अडून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे परिसरात पाणीसाठा कायम राहण्यास मदत होणार आहे.
त्याचप्रमाणे, सुर्ले येथील नळपाणी योजनेची विहीर औषध टाकून स्वच्छ करण्यात आली आहे. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरीला पाणी कमी पडल्यास सुर्ले येथील विहिरीचे पाण्याचा पर्याय उपलब्ध करून ठेवण्यात आला. पाणीटंचाई दिसल्यास पर्यायी विहिरीतून मुख्य विहिरीत पाणी आणून त्या पाण्याचा शहरास पुरवठा करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेत नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख विकास साळवी, स्वच्छता विभाग प्रमुख मनोज मर्चंडे, समीर साळवी, गणेश सापटे, प्रमोद मर्चंडे, मोहन तलार, रूपेश तांबे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन श्रमदानही केले.