संदीप बांद्रे / चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलासाठी केंद्र शासनाने निधी दिला असून, त्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. त्यांच्या या प्रयत्नातून झालेल्या या पुलाचे उद्घाटन करण्याचे अधिकार केवळ त्यांनाच आहेत. हा कोणत्याही पक्षाचा विषय नसून तो केंद्राचा विषय आहे. तेव्हा केंद्राच्या निधीवर शिवसेनेचा नागोबा कितीही वळवळला, तरी शिवसेनेने आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊ नये, असा टोला भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी लगावला आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे चौपदरीकरणांतर्गत काम सुरू आहे. त्यातील एकेरी मार्ग नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत फित कापून शनिवारी हा मार्ग खुला करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम तसेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी अनुपस्थित होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे वाशिष्ठी पुलाच्या उद्घाटनाविषयी भाजपकडून कडवी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजप शहराध्यक्ष अशिष खातू व तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी शिवसेनेच्या या कार्यक्रमाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपला या कार्यक्रमातून जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप केला आहे. आता त्यानंतर भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नातू यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत डॉ. नातू म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग हा विभाग पूर्णतः केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांनी केलेले प्रयत्न जनतेला ज्ञात आहेत. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन करण्याचा अधिकार केवळ गडकरी व राणे यांनाच येतो. मात्र, शिवसेना केवळ श्रेयवाद लाटण्याच्या उद्देशाने परस्पर कार्यक्रम घेत असेल, तर तो आयजीच्या जीवावर बायजी उदार असेच म्हणावे लागेल. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने निधी दिला आहे. तो निधी योग्य पद्धतीने खर्च होत असताना या प्रकल्पाचा त्यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावाही केला जात आहे. मात्र, आता शिवसेनेला त्याचा विसर पडला आहे आणि केंद्राच्या निधीवर शिवसेनेचा नागोबा वळवळू पाहत आहे. मात्र, त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी व नारायण राणे यांच्याच हस्ते होऊ शकते, असेही डॉ. नातू यांनी सांगितले.
-----------------------------
केंद्रीय समितीचा अहवाल बाकी
मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाशिष्ठी पुलाच्या एकेरी मार्गाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, केंद्रीय समितीकडून या कामाविषयी कोणताही अहवाल देण्यात आलेला नाही तसेच अजूनही दुसऱ्या मार्गाचे काम अपूर्ण असून, येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करून तातडीने या कामाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये आतापासूनच या पुलावरून जोरदार राजकारण शिजू लागले आहे.