लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे नाखरे शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. कोरोनामुळे मोजक्याच लाेकांच्या उपस्थितीत श्यामराव पेजे सभागृहात हा साेहळा पार पडला.
रत्नागिरी पंचायत समितीतर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सभापती संजना माने यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते उपस्थित होते. रत्नागिरी तालुक्यामध्ये सन २०१९-२० व २०२०- २१ मध्ये आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सन २०१९-२० मध्ये वरिष्ठ गटातून रत्नागिरी तालुक्यातून आदर्श शाळा पुरस्कार पटकावणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाखरे नं.१ला ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य सुनील नावले यांचे हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शाळा मानकांची पूर्तता, भरघोस शैक्षणिक उठाव, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा यश, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सहभाग, नावीन्यपूर्ण उपक्रम, पालक, ग्रामस्थ, समाज उत्कृष्ट सहभाग, स्वच्छ सुंदर गावासाठी योगदान, तसेच राष्ट्रीय कार्यातील सहभागाचा विचार करून शाळा नाखरे नं. १ची ‘आदर्श शाळा’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. केंद्रप्रमुख महंमद सय्यद, तत्कालीन सरपंच विजय चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोहन जाधव, शशिकांत जाधव, त्याचबरोबर शिक्षक सुहास वाडेकर, सहशिक्षक शशिकांत घाणेकर, अंगणवाडीसेविका मंगला चव्हाण, पूजा धुळप यांचा यामध्ये मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक गोपाळ रोकडे यांनी दिली.