- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : दर्जेदार शिक्षणासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ‘शाळा विकासनिधी’ या नावाखाली ही शुल्कवाढ करण्यात आली असून, नववी ते बारावीत शिक्षण घेणाºया सरसकट सर्वच प्रवर्गांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना आता दरमहा १,५०० प्रमाणे वार्षिक १८ हजार रूपये शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एनटी आणि बीपीएलधारक वगळता निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ७ हजार २०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. पडवे (ता. राजापूर) येथील नवोदय विद्यालयातील १५५ विद्यार्थ्यांना या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे.
ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी १९८६पासून जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. देशातील २८ घटक राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशात ही ७२९ विद्यालये कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत नवोदय विद्यालये आहेत. राजापूर तालुक्यातील पडवे येथे नवोदय विद्यालय कार्यरत आहे. जवाहर नवोदय विद्यालयात दहावीला दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात ८० विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षण व त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ८० टक्के जागा राखीव असल्याने अलिकडे बहुतांश विद्यार्थ्यांचा कल ‘नवोदय’कडे वाढला आहे.
परंतु, मागील काही वर्षांपासून सर्वांसाठी मोफत असलेल्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांची वर्गवारी पाडून शुल्क घेण्याचे सत्र शासनाने सुरू केले आहे. यापूर्वी नववी ते बारावीपर्यंत प्रतिविद्यार्थी प्रतिमहा २०० रूपये शुल्क घेण्यात येत होते. ३१ आॅगस्ट २०१७पासून २००ऐवजी ते ६०० रूपये करण्यात आले. त्यातही नवोदय विद्यालय समितीने २० डिसेंबर २०१७ रोजी परिपत्रक क्रमांक एफ. क्र. १६-१४/२०१७/एनबीएस(एसए) १३६नुसार नवोदय विद्यालयात नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या सरकसट सर्वच प्रवर्गांच्या शासकीय, निमशासकीय कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी शुल्कवाढ केली आहे.
राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे एकूण ४३१ विद्यार्थी आहेत. त्यातील ८७ विद्यार्थ्यांचे पालक हे शासकीय कर्मचारी आहेत, तर ६८ विद्यार्थ्यांचे पालक हे निमशासकीय कर्मचारी आहेत. शासकीय नोकरीतील पालकांच्या पाल्यांना वार्षिक १८ हजार रुपये, तर निमशासकीय नोकरीतील पालकांच्या पाल्यांना ७ हजार २०० रुपये इतके शुल्क आता भरावे लागणार आहे.
शिक्षण सोडण्यास भाग पाडण्यासारखे
नवोदय विद्यालयात पूर्णत: मोफत शिक्षण देण्यात येते. तरीही ही शुल्कवाढ म्हणजे हुशार, गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असा आरोप पालकांनी केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी खूप कष्ट करून गुणवत्ता मिळवूनसुद्धा शुल्क वसूल करणे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्यास भाग पाडण्यासारखेच असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विकासनिधीच्या नावे शुल्कवाढ
नवोदय विद्यालयात वाढविण्यात आलेले हे शुल्क ‘शाळा विकासनिधी’च्या नावाखाली घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रवर्गांच्या कर्मचाºयांच्या पाल्यांना सक्तीने हे शुल्क आकारले जाणार आहे.
पालकांचा विरोध
नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ‘शाळा विकासनिधी’ या नावाने शुल्क वसूल केले जात आहे. हे शुल्क सर्व पालकांना न परवडणारे आहे. यातून होणारे आर्थिक शोषण थांबवावे, अशी मागणी पडवे येथील नवोदय विद्यालयात शिकणाºया पाल्यांच्या पालकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पालकांनी नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना दिले आहे.
शुल्कवाढीचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. या शुल्क वाढीबाबत पालकांनी आपल्याशी चर्चा केली आहे. शासनानेच हा निर्णय घेतल्याने विद्यालयस्तरावर त्यावर कोणताही निर्णय होऊ शकत नाही. पालकांच्या व्यथा समजून त्या शासनस्तरावर मांडण्यात येतील.
- सुनीलकुमार तल्लथ, प्राचार्य, नवोदय विद्यालय, पडवे, राजापूर