खेड : तालुक्यातील बीजघर येथे श्री सांप्रदाय सेवा समिती, खेड सेवा केंद्राच्या बीजघर तिसंगी सेवा केंद्राच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी सभापती विजय कदम, पंचायत समितीचे सदस्य राजू कदम, तिसंगीचे पोलीस पाटील संतोष मोहिते, सेवा केंद्र अध्यक्ष सुनील लाड, आदी उपस्थित होते.
मोहित तेंडोलकर प्रथम
रत्नागिरी : राज्यस्तरीय टेक्नोव्हेव्ह स्पर्धेत देवरुखच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयातील मोहिते तेंडोलकरने प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आदित्य जोशी आणि ठाकुर्ली मॉडेल कॉलेजच्या भवानी उदीयार यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.
रस्ता कामाचे भूमिपूजन
देवरुख : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी केतकणेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले. कित्येक दिवसांची मागणी पूर्णत्वाला आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
शाळेला देणगी
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथील नागरिक कृष्णदास नलावडे यांनी पत्नी कल्पना नलावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कापसाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ ला ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीबद्दल शाळेच्यावतीने कृष्णदास नलावडे यांचा सत्कार करण्यात आला.
नागरिकांना दिलासा
रत्नागिरी : केंद्र सरकारने आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवून दिली आहे. आता पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा ३० जून २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पॅनकार्ड आधार क्रमांकाला न जोडलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पालखी उत्सव रद्द
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीमुळे तालुक्यातील मागलाड येथील श्री देव लक्ष्मीकेशव मंडळाचा ३ एप्रिल रोजी होणारा पालखी उत्सव रद्द करण्यात आला आहे. श्री देव लक्ष्मीकेशवाच्या उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
माकडांचा उपद्रव
राजापूर : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरामध्येही माकडांचा उपद्रव वाढला आहे. खाण्याच्या तसेच पाण्याच्या शोधात या माकडांच्या टोळ्या धुमाकूळ घालू लागल्या असून, विविध झाडांची नासाडी करीत आहेत. केळी, पेरू, चिकू, आदी फळांची नासाडी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे.
पाण्याची टंचाई
रत्नागिरी : जिल्ह्यात नऊ मोठी बसस्थानके आणि छोटी बसस्थानके आहेत. या सर्व बसस्थानकात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. सध्या उष्मा वाढू लागल्याने तहानेने प्रवासी हैराण होत आहेत. मात्र, या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
विजेचा लपंडाव कायम
रत्नागिरी : विजेची बिले वेळेवर भरली नाहीत तर महावितरण कंपनीकडून लगेचच वीजपुरवठा तोडला जातो. परंतु, वेळच्यावेळी बिले भरूनही गेल्या काही दिवसांपासून विजेच्या लपंडावाला सुरुवात झाली आहे. यामुळे व्यावसायिक आणि अन्य ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे.
धुळीचा त्रास
लांजा : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम सध्या वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे या महामार्गावर धूळ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यातच सध्या वेगवान वारे वाहू लागल्याने या धुळीचा त्रास नागरिकांना अधिकच होऊ लागला आहे. वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.