राजापूर : कोरोनाबाधित व्यक्तीवर कोणत्याही नियमांचे पालन न करता अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी कोंढेतड येथील त्या सातही संशयितांची नावे निश्चित करण्यात आली आहेत़ त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. लवकरच त्यांची कोरोना चाचणी करून त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
शहरानजीकच्या कोंढेतड येथील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह उघडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील सातही आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत़ यामध्ये काेेंढेतड येथील रिजवान अकबर सारंग, इरफान रशीद काझी, इक्बाल इस्माईल बलबले, फकीर जाफर हवालदार, मतीन शब्बीर हवालदार, अजीम इब्राहीम जैतापकर, रशिद अलिमियॉ काझी यांचा समावेश आहे.
या सातही जणांना पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ४१.१ नोटीस बजावली आहे. हे सर्वजण त्या कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने त्यांची कोरोना चाचणी करून अटक व अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे.