रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील विजयाचा दावा करणारी उद्धवसेना म्हणजे दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान म्हणत आहे, अशी टीका महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केली.स्वत:चे मतदान झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देऊन नारायण राणे रत्नागिरीमध्ये दाखल झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नारायण राणे यांनी रत्नागिरीतल भाजपच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धवसेनेवर टीका केली.उद्धवसेनेकडून दोन-तीन लाखांच्या मताधिक्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, दुकानात माल नाही आणि तरी सर्व छान चालले आहे, असे म्हणण्यासाठी उद्धवसेनेची अवस्था आहे. माणसेच नाहीत तरी ते दावे मात्र मोठमाठे करत आहेत. आपल्या प्रचारात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.
विनायक राऊत यांनीही घेतला आढावामहाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनीही प्रचार संपल्यानंतर जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिका-यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला. मतदान सुरू असताना त्यांनी अनेक ठिकाणी स्वत: भेट देत बूथवरील पदाधिका-यांशी चर्चा केली.आमदार राजन साळवी आणि आमदार वैभव नाईक आपापल्या मतदारसंघातच मतदानाचा आढावा घेत होते. जिल्हाप्रमुख विलास चाळके रत्नागिरी मतदार संघासह जिल्ह्यातील मतदानाबाबत आढावा घेत होते. सायंकाळी सर्वांनी राऊत यांच्याशी मतदानाच्या टक्केवारीबाबत चर्चा केली.