केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटले असून राणे यांच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अटक करण्यास निघालेल्या पोलिसांकडेअटक वॉरंट नसल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत.
केंद्रीय मंत्री असल्याने काही प्रोटोकॉल आवश्य पाळले पाहिजे. आम्हाला अटक वॉरंट दाखवा, राणे पोलिसांच्या गाडीत बसून अटक व्हायला तयार आहेत. पोलिसानं सांगतात आम्हाला दोन मिनिटात अटक करायला सांगितली आहे, अशी माहिती प्रमोद जठार यांनी पुढे दिली. आम्ही कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेलो आहोत. तसेच राणे यांची तब्येत बिघडली असून त्यांचा बीपी आणि शुगर वाढली आहे. त्यांना डॉक्टर तपासत असल्याची देखील माहिती जठार यांनी दिली.
संगमेश्वर येथे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांनी नारायण राणेंना त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याबाबत माहिती देत आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून रत्नागिरी कोर्टात राणेंना हजर केले जाणार असून त्यानंतर ट्रान्सीट रिमांडद्वारे राणेंना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.