रत्नागिरी : दोनवेळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढत रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नारायण राणे यांनी उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. राणे यांना ४७,८५८ इतके मताधिक्य मिळाले. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण या तीनही विधानसभा मतदारसंघात राऊत यांना आघाडी मिळाली असली तरी त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आघाडी राणे यांना कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात मिळाली आणि त्यामुळेच त्यांना विजय मिळाला.नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे असा पारंपरिक राजकीय सामना रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होत असल्याने ही निवडणूक दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मावळते खासदार विनायक राऊत २०१९ साली १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी विजयी झाले होते. त्यांचे हे मताधिक्य तोडून स्वत:ला आघाडी मिळवण्याचे मोठे उद्दिष्ट राणे यांच्यासमोर होते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याने त्यांना आपलेपणाची साथ दिल्याने राणे यांना हा विजय शक्य झाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मतदारसंघात उद्धवसेना आणि सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघात राणे यांचे वर्चस्व राहणार, हे निश्चित होते. त्यानुसार रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना १०,०३७ मताधिक्य मिळाले. चिपळूणमध्ये १९,६२७, तर राजापूरमध्ये तब्बल २१,४७१ मताधिक्य विनायक राऊत यांच्या पारड्यात पडले. म्हणजेच त्यांना ५१,१३५ इतके मताधिक्य तीन मतदारसंघात मिळाले. अर्थात त्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने अधिक झुकते माप राणे यांच्या पदरात टाकले. कुडाळ विधानसभा मतदारसंघात राणे यांना २६,२३६, उद्धवसेनेचे आमदार असलेल्या कुडाळमध्ये ३१,७१९, तर हक्काच्या कणकवलीमध्ये तब्बल ४१,९९५ इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे राणे यांचे सिंधुदुर्गच्या तीन मतदारसंघातील मताधिक्य ९९,९५० इतके झाले आणि राणे विजयी झाले.
उद्धवसेनेची ताकद घटलीसिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धवसेनेची पुरती पीछेहाट झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात राऊत यांना आघाडी मिळाली असली तरी गतवेळी ती या तीन मतदारसंघातच दीड लाख इतकी मते मिळाली होती. ती आता फक्त ५१ हजारांवर आली आहे.
शिंदेसेनेला धोक्याचा इशारारत्नागिरीच्या तीन मतदारसंघात उद्धवसेनेचे मताधिक्य घटले असले तरी अजूनही ते अधिक असल्याने ही शिंदेसेना किंवा महायुतीच्या आमदारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. विधानसभेला हीच गणिते कायम राहत नसली तरी शिंदेसेनेला मतदारांना गृहीत धरून चालणार नाही. त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे स्पष्ट दिसत आहे.