रत्नागिरी : नारायण राणे हे खूप मोठे नेते आहेत. भाजपवाले त्यांना कधीच मोठे होऊ देणार नाहीत. एवढा जाहीर अपमान सहन करण्यापेक्षा नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावे, असा सल्ला काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत दिला.रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या बांधणीसाठी हुसेन दलवाई आज रत्नागिरीत आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा विचार करावा, असे सुतोवाच काढले.
यावेळी हुसेन दलवाई म्हणाले की, काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी लवकरच नवा जिल्हाध्यक्ष मिळेल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेसमध्ये कोणतेच गटतट नसून, जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस जोमाने उभी राहिलेली सर्वांना दिसेल, असा विश्वास दलवाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.केंद्र आणि राज्य सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरले आहे. तरीदेखील हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असे सांगून शिवसेना सत्ता सोडणार नसल्याचेही दलवाई यावेळी म्हणाले. शिवसेनेने आपली नेमकी भूमिका काय आहे ते एकदा स्पष्ट करावे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार फडणवीस सरकारला कधीच पाठिंबा देणार नसल्याचे ते म्हणाले.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने कोकणावरही अन्याय केला असून, कोकणातील अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. मुंबई-गोवा महामार्ग खड्ड्यांचा मार्ग बनला आहे. याविरोधात २७ नोव्हेंबरपासून पनवले ते सावंतवाडीपर्यंत जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी माहिती हुसेन दलवाई यांनी यावेळी दिली.