मालवण : भाजपकडून खासदारकी मिळवायची आणि भाजपविरोधातच काम करायचे, यापेक्षा आपल्या पक्षाच्या नावाप्रमाणे राणेंनी स्वाभिमान दाखवत खासदारकीचा राजीनामा देत मैदानात उतरावे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुलाचा राजीनामाही राणेंनी द्यावा, असे आव्हान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंना दिले आहे.दरम्यान, एवढे दिवस गप्प होतो ते तुम्हाला घाबरून नव्हे, तर जनतेची कामे करीत विकासनिधी आणत होतो. आता मैदानात उतरत तुमचे खरे रूप जनतेसमोर आणणार, असे सांगत मंत्री केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला.शिवसेना - भाजप - आरपीआय (आठवले गट), रासप युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील हिवाळे जिल्हा परिषद मतदारसंघातील श्रावण येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री केसरकर यांनी खासदार नारायण राणेंना लक्ष्य केले. पक्षाच्या नावाप्रमाणेच राणेंनी आता जरा तरी स्वाभिमान दाखवावा, असे केसरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, बाबा आंगणे, बाबा सावंत, दुलाजी परब, अरुण लाड, सुभाष धुरी, बंडू चव्हाण, छोटू पारकर, समीर हडकर, विठ्ठल घाडी, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, दीपक सांडव यांसह शिवसेना - भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी हरी खोबरेकर, विजय केनवडेकर, जान्हवी सावंत यांनीही आक्रमक शैलीत विचार मांडले. यावेळी विनायक राऊत यांनीही मार्गदर्शन केले.
नारायण राणेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा: दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:04 PM