राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, नाटे ग्रामपंचायतीने आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित असलेली दीड हजार एकर व लगतच्या परिसरातील जागेत रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, यासाठी राजापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हावासीय जोरदार प्रयत्न करत असताना शासन मात्र आपली भूमिका ठामपणे जाहीर करत नव्हते. अशातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मौन सोडत रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून, तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली. मात्र, तो नाणारला न होता अन्य ठिकाणी होईल, असेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्प नाटे परिसरात राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती राजापूरवासीयांना मागील काही वर्षात झालेली आहे. नाणार येथील अधिसूचना रद्द झाल्यानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेची जेथे मागणी असेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल, असे जाहीर केले होते. रिफायनरी प्रकल्प गावच्या, तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा असून, अशा प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो. नाटे येथे यापूर्वी आयलॉग जेटीसाठी दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागेत रिफायनरी राबवावा, त्याकरिता आवश्यक सहकार्य ग्रामपंचायतीकडून मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नाटे ग्रामपंचायतीने तसा ठरावही पारीत केला असून, त्याच्या प्रतीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
आंबोळगड - नाटे परिसरात शासनाचा आयलॉग हा जेटी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता मुख्यमंत्री त्याला कसा प्रतिसाद देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.