रत्नागिरी : रत्नागिरीतील पर्यटन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून येत्या २८ मे रोजी रत्नागिरी फिशर्स क्लबने राष्ट्रीय स्तरावरील ओपन सर्फ फिशिंग टूर्नामेंट प्रथमच आयोजित केली आहे.
रत्नागिरीतील निसर्गसुंदर अशा भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. हळुहळू गर्दी सुद्धा वाढत आहे. हेच आैचित्य साधून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व रत्नागिरीतील पर्यटन वाढण्याच्या दृष्टीकोनातून उद्योगमंत्री, रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून रत्नागिरीत प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील ओपन सर्फ फिशिंग टूर्नामेंट आयोजित केली आहे. ही स्पर्धा शहराला लागून असलेल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर रविवार दि. २८ मे रोजी होणार आहे. स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरू होईल व सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहील सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्यास ५०,००० रूपये , द्वितीय पारितोषिक विजेत्यास ३०,००० रूपये आणि तृतीय पारितोषिक विजेत्यास २०,००० रूपये, सोबत रॉड व रिळ व अन्य फिशिंग संदर्भातील वस्तू देण्यात येतील. या व्यतिरिक्त इतर खास पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक अँगलर्सला २००० रुपयांचे वेलकम किट आणि आकर्षक ग्रुप टिशर्ट, ग्रुप कॅप, चहा-नाष्टा,व्हेज- नॉन व्हेज जेवण, कोल्ड्रिंक्स आणि संध्याकाळचा चहा व इतर अनेक आकर्षक बक्षिसे दिली जातील. ही स्पर्धा १०० लोकांसाठी आयोजित केली आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. रत्नागिरीत राष्ट्रीय स्तरावरील पहिलीच स्पर्धा होत आहे. रत्नागिरीतील पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष नित्यानंद भुते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष सावंत, केतन भोंगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.काय आहे सर्फ फिशिंग
सर्फ फिशिंग म्हणजे समुद्रकिनाऱ्यांवर मिळणाऱ्या माशांना गळ टाकून पकडले जाते आणि त्यानंतर वजन करून सुरक्षितरित्या पुन्हा समुद्रात सोडले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा खेळवली जाते. रत्नागिरीत यापूर्वी जिल्हास्तरीय सर्फ फिशिंग स्पर्धा घेण्यात आली होती. आता राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा प्रथमच होत असल्याने रत्नागिरीकरांमध्येही उत्सुकता आहे.