मंडणगड : गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा याेजना विभागातर्फे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून याच महाविद्यालयाचे डॉ. अशोक साळुंखे उपस्थित होते.
यावेळी विभागीय समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, कार्यक्रमाधिकारी प्रा. शरीफ काझी, प्रा. हनुमंत सुतार, ग्रंथपाल दगडू जगताप उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा. शरीफ काझी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. अशोक साळुंखे यांनी सांगितले की, महाविद्यालयाच्या स्थापना वर्षापासूनच राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आपल्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याची उज्ज्वल परंपरा स्थापित केली आहे. या विभागात सक्रिय राहणाऱ्या सर्वच स्वयंसेवकांना आपल्या सर्वांगीण विकासाची संधी मिळते, असे सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत केले जात असल्याचे स्पष्ट केले. स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत समाजसेवेची संधी यातून विद्यार्थ्यांना मिळत असते, पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असावी लागते. यामध्ये घडलेला विद्यार्थी कोणत्याही क्षणी मदतीला धावला पाहिजे, तरच यामध्ये प्रवेश घेतल्याचे सार्थक होईल, असे ते म्हणाले. प्रा. हनुमंत सुतार यांनी आभार मानले.