रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी दोन मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार झाले. २०१९ साली उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यानंतर ती वाढलेली नाही. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी २०१९ मध्ये शहराध्यक्ष पदी तरुण कार्यकर्ते नीलेश भोसले यांची नियुक्ती केली. दोन वर्षे शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या उपक्रमात ते सहभागी होत आहेत. मात्र, त्यांच्या आधीचे शहराध्यक्ष मनू गुरव यांनी अजूनही आपणच शहराध्यक्ष असल्याचे सांगितले. तेथून हा वाद सुरू झाला आहे.
सोमवारी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब समोर आणली. नगर परिषद निवडणुकीसाठीच्या समितीत मिलिंद कीर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही वगळण्यात आले. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी चर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या आरोपांना ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करा, असे कुमार शेट्ये यांनी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाच पक्षातून काढून टाका, अशी मागणी राजाभाऊ लिमये, प्रदेश सदस्य बशीर मुर्तुझा, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. मर्जीतील लोकांना पदे मिळवून देण्यासाठी कुमार शेेट्येच पक्षात फूट पाडत असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली जाणार आहे.
.................
लवकरच बैठक
रत्नागिरीत निर्माण झालेल्या या वादाबाबत लवकरच बैठक घेण्याची भूमिका जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी घेतली असल्याचे समजते. येत्या चार दिवसांत रत्नागिरीत बैठक घेऊन या दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
...................
नेते भांडणात मश्गुल
मुळात पक्षाची ताकद घटलेली असताना आणि महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतलेले नसताना पक्ष वाढवण्यावर भर देण्यापेक्षा नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. त्यामुळे उरलेसुरले कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.