रत्नागिरी : तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारी कामावर येताना येणाऱ्या अडचणी तसेच रविवारपासून वीजपुरवठा तसेच इंटरनेटची समस्या असल्याने त्याचा कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच खासगी आणि व्यापारी बँका सोमवारी बंद ठेवण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक नंदकिशोर पाटील यांनी दिली. सोमवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये लाॅकडाऊन असल्याने बॅंक बंदचा परिणाम तसा फारसा जाणवला नाही.
तौेक्ते वादळाचे आगमन जिल्ह्यात रविवारपासून होणार होते. मात्र, त्याच्या प्रभावामुळे शनिवारपासूनच जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर वाऱ्याच्या जोरदार माऱ्यासह दुपारनंतर मुसळधार पाऊस होता. वारा आणि संततधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मार्ग बंद झाले. वीजवाहिन्यांवरही झाडाच्या फांद्या पडल्याने तसेच काही ठिकाणी पोलही कोसळून पडल्याने जिल्ह्यातील वीजपुरवठाही खंडित झाला.
सोमवारी सकाळपर्यंत वारा आणि पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे काही ठिकाणी सोमवारी दुपारपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक मार्ग बंद असल्याने बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर येताना विशेषत: ग्रामीण भागातील बँंकांना अधिक अडचणी होत्या. त्याचप्रमाणे खंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवेत येणाऱ्या अडचणींचा परिणाम बॅंकांच्या कामकाजावर होणार होता. त्यामुळे राज्य स्तरावरील बॅंकर्स कमिटीच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आणि व्यापारी बॅंका सोमवारी बंद ठेवण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती. त्यानुसार बॅंकांना सोमवारी बंद ठेवण्यास जिल्हा प्रशासनाकडून विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आल्याने सोमवारी जिल्ह्यातील राष्ट्रीय, खासगी तसेच व्यापारी अशा सुमारे ३३० बॅंका बंद होत्या.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ताैक्ते वादळाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून रत्नागिरी, राजापूर, गुहागर, मंडणगड आणि दापोली या पाच तालुक्यांमध्ये रविवार आणि सोमवार असे दोन दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे बॅंक बंद असल्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखा तसेच सहकारी बॅंका मात्र सोमवारी सुरू होत्या.