मंडणगड : निसर्ग चक्रीवादळाच्या कालावधीत आरोग्य विभागाच्या ताब्यातील व कर्मचाऱ्यांच्या वापरातील नुकसानग्रस्त इमारतींच्या दुरुस्तीकडे आरोग्य विभागासह सर्व संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. यावर्षी पावसाला सुरुवात झाली तरी आरोग्य विभाग याबाबत पत्रव्यवहाराच्या पलिकडे सरकलेला नाही. आरोग्य विभागाच्या ताब्यातील पंदेरी, कुंबळे, देव्हारे येथील आरोग्य केंद्रांच्या इमारती आजही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
एक वर्षाचा कालावधी लोटला तरी या इमारतींच्या डागडुजीकडे कोणीही लक्ष दिलेले नाही़. स्थानिक आरोग्य विभागाने वरिष्ठांना इमारतींचे नुकसानाबाबत केवळ सूचित केले आहे. या इमारती नियमित वापराच्या असल्याने त्यांची डागडुजी अग्रक्रमाने आवश्यक असताना कोरोनाशी दोन हात करण्याचे कारण सांगत आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष करत कर्मचाऱ्यांना धोक्यात टाकले आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त इमारतींचे नुकसानही मोठे असल्याने या इमारती धोकादायक झाल्या असून, वापरायोग्य राहिलेल्या नाहीत.
देव्हारे येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची शेड नादुरुस्त आहे याशिवाय आरोग्य केंद्रांच्या परिसरातील कर्मचारी वसाहतीतील इमारती नादुरुस्त आहेत. कर्मचारी या नादुरुस्त इमारतींचा वापर करत आहेत. कुंबळे आरोग्य केंद्राच्या परिसरातील इमारतीही अशाच पध्दतीने नादुरुस्त आहेत. आरोग्य विभागाने याकडे लक्ष न दिल्यास पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना जीविताचा धोका पत्करुन राहावे लागणार आहे. काेराेनाचे कारण देत दुरूस्तीकडे दुर्लक्ष हाेत असतानाच तालुक्यातील अनेक आरोग्य उपकेंद्र इमारतींचे बांधकाम हंगामात नव्याने झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
--------------------------------------
मंडणगड तालुक्यातील देव्हारे आरोग्य केंद्राचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते. आजही ही इमारत दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे.