राजापूर : प्रति कोल्हापूर म्हणून ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारपासून (१५ ऑक्टोबर) घटस्थापनेपासून प्रारंभ होणार आहे. उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून आडिवरेतील श्री महाकालीची सर्वदूर ख्याती आहे. उत्सव काळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून मंदिर व्यवस्थापनाकडून सज्जता करण्यात आली आहे. उत्सव काळात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळात पूजापाठ, अभिषेक व महानैवैद्य, दुपारी ३ वाजता घटाची आरती, सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत राजापूर येथील ह. भ. प. विद्याधर करंबेळकर यांचे कीर्तन, सायंकाळी ६:३० वाजता धुपारती, त्यांनतर रात्री ७ ते ८ या वेळात रत्नागिरी येथील वेदशास्त्र ओंकार मुळ्ये यांचे प्रवचन, रात्री ८ ते ९ या वेळेत सांगली येथील अभिषेक काळे यांचा गायन कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ ते १०:३० या वेळेत पालखी प्रदक्षिणा होईल. दररोजच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये रात्री ११ वाजता रविवारी, १५ रोजी बाळगोपाळा दशावतार, सोमवारी, १५ रोजी श्री वडेश्वर नमन मंडळ रूंढे तळी यांचे नमन, १६ रोजी दशावतार, १८ रोजी दशावतार, १९ रोजी शक्तीतुरा डबलबारी, २० रोजी गावखडी येथील नाटक होणार आहे. २२ रोजी रत्नागिरी येथील नमन मंडळ श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी सादर होणार आहे. २३ रोजी शक्तीतुरा डबलबारीचा सामना, २४ रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. दररोज सायंकाळी ६:३० ते ९:३० वाजेपर्यंत विविध पारंपरिक कार्यक्रमांमुळे देवीचे दर्शन बंद राहणार असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले आहे.
आडिवरेतील देवी महाकालीचा उद्यापासून नवरात्रोत्सव, प्रति कोल्हापूर म्हणून ओळख
By मनोज मुळ्ये | Published: October 14, 2023 4:26 PM