राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राजापूर तालुक्यात राष्ट्रवादीला हादरा दिला आहे. राष्ट्रवादीचे ओणीचे पंचायत समिती माजी सदस्य प्रतीक मठकर यांनी आपल्या समर्थकांसह सोमवारी मुख्यमंत्री आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश झाला.
गेली काही वर्षे ते ओणी विभागात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. ते गेली पाच वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी शिवसेनेला मोठे आव्हान उभे केले असल्याने गेली दहा वर्षे राष्ट्रवादीने ओणी पंचायत समिती गण आपल्याकडे ठेवला आहे.
सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी प्रतीक मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष सचिव, खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
१९ मे रोजी ओणी येथे शिवसेनेच्यावतीने मोठा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये ओणीतील राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रवादीचे दोन्ही माजी सदस्य शिवसेनेत
पाच वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये पाचल पं. स. च्या सदस्या अमिता सुतार यान्नी यापूर्वीच पक्षत्याग करून शिवसेनेत प्रवेश केला होता नंतर त्यांची उपसभापतिपदी निवड झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे दुसरे सदस्य प्रतीक मठकर यान्नी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही माजी सदस्य शिवसेनेत दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुर्वी शिवसेनेने राष्ट्रवादीला दणका दिला असल्याची तालुक्यात चर्चाना सुरुवात झाली आहे.