खेड : देशामध्ये डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस यांचे दर गेली काही वर्षे सातत्याने वाढण्यास केंद्रातील भाजपचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देऊन इंधनवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमती गेल्या काही वर्षात वेगाने वाढल्या असून, या इंधन दरवाढीचा थेट परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. कोरोना जागतिक महामारीमुळे व्यवसाय, उद्योगधंदे यामध्ये मंदीचे वातावरण असताना सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या इंधन दरवाढीविराेधात राष्ट्रवादीकडून खेडमध्ये दिनांक ५ जुलै रोजी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार संजय कदम, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अश्विन भोसले, नगरसेवक अजय माने, नगरसेविका जयमाला पाटणे, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी आंदोलकांची भेट घेत मागण्या समजावून घेतल्या व राष्ट्रवादीकडून देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.
---------------------
खेड येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदाेलन केले. यावेळी तहसीलदार प्राजक्ता घाेरपडे यांना निवेदन देण्यात आले.