दापोली : दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, सेनेच्या या बालेकिल्ल्यातील जालगाव, हर्णै, पालगड या मतदार संघात राष्ट्रवादीने जोरदार ‘फाईट’ दिल्याने सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी जोरदार लढत देणार आहे. यामुळे पंचायत समितीची एकहाती सत्ता मिळविणे सेनेसाठी डोईजड बनले आहे. त्यातच तालुक्यात स्वाभिमानी बहुजन पक्षाने मुसंडी मारल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालगड पंचायत समिती गण सेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळी या गणातून सेनेच्या संजना गुजर निवडून आल्या होत्या. मात्र, यावेळी पालगड गणातून सेनेचे राजेंद्र फणसे, राष्ट्रवादीचे राजेश गुजर रिंगणात आहेत. सेनेच्या या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीने जोरदार लढत दिल्याने सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशा जोरदार लढतीची शक्यता आहे. हा मतदारसंघ सेनेचा असला, तरीही या मतदार संघात राष्ट्रवादी अलिकडच्या काळात चांगलीच फोफावतेय. पंचायत समितीच्या जालगाव गणातून यावेळी भाजप, सेनेचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम ईदाते, सेनेचे माजी सरपंच मनोज भांबीड, राष्ट्रवादीचे अरुण पालटे, स्वाभिमानीचे सुभाष धोपट यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. सर्वात लक्षवेधी मतदारसंघ म्हणून जालगावकडे पाहिले जात आहे. हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु, या मतदार संघात भाजप व स्वाभिमानी बहुजन संघ यांनी लढत रंगतदार केली आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच स्वाभिमानी पक्षाने आपला उमेदवार उभा केल्याने सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.दापोली तालुका सेनेचा बालेकिल्ला असला तरी हर्णै पंचायत समिती गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीचे उपतालुकाध्यक्ष रऊफ हजवाणे, सेनेतर्फे हर्णै ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश पवार, भाजपतर्फे पांडुरंग पावसे निवडणूक रिंगणात आहेत. हर्णै गट हा राष्ट्रवादीचा गट म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीसमोर हा गट राखण्याचे आव्हान आहे. मात्र, या मतदारसंघात भाजप, सेना राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत.राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच झगडावे लागत असून, हर्णै गणात खरी लढत राष्ट्रवादीचे रऊफ हजवाणे विरुद्ध सेनेचे महेश पवार यांच्यात होणार आहे. हर्णै गाव आमदार संजय कदम यांनी दत्तक घेतल्यामुळे राष्ट्रवादीला हा गड आपल्याकडे राखण्याची आशा आहे. मात्र, सेना - भाजप सत्तेत असल्याने या निवडणुकीत हर्णै जेटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. (प्रतिनिधी)विशेष लक्षआमदार संजय कदम यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घातले आहे. यावेळी ही निवडणूक सोपी जाईलच असे नाही. तुल्यबळ उमेदवारामुळे रंगत वाढली आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘फाईट’
By admin | Published: February 19, 2017 12:30 AM