प्रकाश वराडकर/आॅनलाईन
लोकमत रत्नागिरी, दि. 0४ : आमदार भास्कर जाधव व संजय कदम यांनी गावागावात राष्ट्रवादी कॉँग्रेसची चांगली बांधणी केली. त्याद्वारे गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतील सेनेची तटबंदी मोडीत काढली. आता दक्षिण रत्नागिरीतही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मजबूत पक्षबांधणी करावी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेला ‘जोर का झटका’ देण्यास तयार राहावे, असा सूर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हा मेळाव्यात आळवला गेला. यातून दक्षिण रत्नाागिरीत सेनेला आपली तटबंदी सांभाळण्याचे आव्हानच राष्ट्रवादीने दिले आहे.
येथे अजित यशवंतराव यांचे नेतृत्व आक्रमकतेने पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहेत. उत्तर रत्नागिरीत खेड, मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागर या पाच तालुक्यांचा समावेश होतो. तर दक्षिण रत्नागिरीत संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर हे चार तालुके येतात. गेल्या दोन दशकांमधील जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहता, शिवसेना हा पक्ष जिल्ह्यात सर्वाधिक ताकद असलेला आहे. तळागाळात या पक्षाच्या शाखा आणि कार्यकर्ते आहेत. नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये सेवाभाव आणि आक्रमकता आहे. त्या बळावरच जिल्ह्यात शिवसेनेचे ‘स्ट्रॉँग नेटवर्क’ आहे.
गेल्या पंधरा वर्षांमधील उत्तर रत्नागिरीतील सेनेच्या मजबूत गडाचे बुरुज कदम, जाधव यांच्यामुळे ढासळले. सेनेच्या मुशीतच तयार झालेले हे नेते आज राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्ह्यातील ‘स्ट्रॉँगमन’ ठरले आहेत. शिवसेनेतील पक्षबांधणीच्या अनुभवाचा फायदा आता त्यांच्याकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसला होताना दिसून येत आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्यात आवर्जून सांगितले.
या पार्श्वभूमीवर आमदार जाधव व कदम यांच्या संघटन कौशल्याचा लाभ दक्षिण रत्नागिरीतही पक्षसंघटनेला व्हावा, असे पक्षनेतृत्वाचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच लांजा-राजापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे अजित यशवंतराव यांना दक्षिण रत्नागिरीच्या संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या चार तालुक्यात आक्रमकतेने पुढे आणण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर उमेश शेट्ये, बशीर मुर्तुझा यांच्याकडेही मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
उत्तर रत्नागिरीत आक्रमक नेतृत्व करणाऱ्या आमदार भास्कर जाधव, संजय कदमांप्रमाणेच दक्षिण रत्नागिरीलाही कणखर, आक्रमक नेतृत्व पक्षाने द्यावे, ही येथील कार्यकर्त्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी अजित यशवंतराव यांच्या नावाला अनेकांकडून हिरवा कंदील दाखवला जात होता.