चिपळूण : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) तुकडी शनिवारी चिपळूण शहरात दाखल झाली. पूरपरिस्थितीच्या काळात बचावकार्यासाठी आवश्यक तयारी सोमवारीपासून केली जाणार आहे. या तुकडीमध्ये एक अधिकारी आणि २९ जवान आहेत. पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्याकडून मदत कार्य केले जाणार आहे.
जून महिना अर्धा झाला तरी पावसाचा जोर म्हणावा तेवढा नाही. आतापर्यतचा इतिहास पाहता जूनच्या शेवटच्या आठवडयात पाऊस धुमाकूळ घालतो. २०२१ मध्ये जूनअखेर अतिवृष्टी झाली होती. राज्य शासनाने त्याची दखल घेत मागील चार वर्षापासून पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफचे जवान चिपळूणला पाठवले आहेत. चिपळूणमध्ये एनडीआरएफची तुकडी पाठवण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानूसार एनडीआरएफच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एनडीआरएफ तुकडीचे निरीक्षक राज कुमार हे या तुकडीमध्ये अधिकारी आहेत. कापसाळ येथील विश्रामगृहामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या तुकडीने मोटार बोटसह इतर आवश्यक बचावकार्याच्या साधनांनी उपलब्धता केली आहे. काही साधने नगर परिषदेने उपलब्ध केली आहेत. या तुकडी सोबत 'रुगर' नावाचा श्वान असून त्याने अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत काम केले आहे.