खेड : तालुक्यातील धामणंद उपकेंद्र चालू करण्यासाठी एनडीआरएफची टीम महावितरणच्या मदतीला धावली. त्यामुळे हे उपकेंद्र आता लवकरच सुरु होईल.
या उपकेंद्रासाठी खेर्डी ते कळंबस्ते अशी वाशिष्ठी नदीतून वीज वाहिनी नेणे आवश्यक होते. नदीला पाणी जास्त असल्याने ते शक्य होत नव्हते. चिपळूणचे कार्यकारी अभियंता लवेकर यांनी प्रांताधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधून एनडीआरएफची टीम देण्यास विनंती केली. त्यानुसार एनडीआरएफची टीम महावितरणच्या मदतीला आली. या टीमच्या मदतीने उप कार्यकारी अभियंता पालशेतकर व सहाय्य अभियंता सकपाळ व कर्मचाऱ्यांनी ही वीज वाहिनी जोडण्याचे काम केले. त्यामुळे आता धामणंद उपकेंद्र चालू करता येईल व त्यामधून वीज पुरवठा सुरळीत करता येईल. या धाडसी कामाबाबत मुख्य अभियंता सायनेकर यांनी एनडीआरएफ टीमचे व कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले.