मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट फाॅर अंडर ग्रॅज्युएट’व्दारे राज्य, सीबीएसई, आयसीएसई बाेर्डातून बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी परीक्षा देण्यात येते. देशपातळीवर ही परीक्षा घेण्यात येत असून जागा कमी व प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच प्रवेश परीक्षा घ्यावी लागते. परंतु जर ‘नीट’ परीक्षाच घेतली गेली नाही, तर मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय, परीक्षेची विश्वासार्हताही राखणे गरजेचे आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. जागा कमी व विद्यार्थी जास्त असल्याने साहजिकच बारावीच्या गुणांपेक्षा ‘नीट’च्या गुणांवर विद्यार्थ्यांचा कस लागतो. त्यामुळे ‘तामिळनाडू’च्या धर्तीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय अयोग्य असेल. अकरावीपासूनच विद्यार्थी ‘नीट’च्या परीक्षेची तयारी करीत असतात. गुणांकन मिळविण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो, त्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. यावर्षी बारावीची परीक्षा न होता मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘नीट’ रद्द करणे चुकीचे ठरेल.
परीक्षेची विश्वासार्हता जपावी
‘नीट’ परीक्षेशिवाय बारावीच्या गुणांवर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश चुकीचा निर्णय आहे. विविध मंडळाच्या बारावी परीक्षा दिलेले विद्यार्थी ‘नीट’साठी देशपातळीवर एका समान व्यासपीठावर येतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रवेश दिला जातो. त्यामुळे तामिळनाडूचे अनुकरण आपल्याकडे तरी होऊ नयेच ‘नीट’ परीक्षा होणे गरजेचे आहे.
- डाॅ. किशोर सुटखटणकर
‘नीट’ वैद्यकीय प्रवेशासाठी निश्चित केली आहे. बारावीच्या गुणांवर स्पेशलायझेशनची क्षमता कळणार नाही. अन्य राज्यांच्या निर्णयाची ‘री’ आपल्या राज्यात ओढून शिक्षणाचे बाजारीकरण करू नये. प्रत्येक क्षेत्रासाठी परीक्षा निश्चित आहे. परीक्षा घेत असतानाच परीक्षेची विश्वासार्हता जपणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा गुणवत्ता धुळीस मिळेल.
- ॲड. विलास पाटणे
परीक्षा रद्द करू नये
प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम निश्चित आहे. ठरावीक जागा असल्याने प्रवेश परीक्षा घ्यावी लागते. ती जबाबदारी एका संस्थेकडे देण्यात येते. बारावीची परीक्षा विविध मंडळांकडून दिलेले विद्यार्थी असतात. परंतु प्रवेश परीक्षेसाठी एका व्यासपीठावर यावे लागते. ‘नीट’ रद्दचा निर्णय निश्चितच चुकीचा असून यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
- साहिल जोशी
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्याकरिता प्रवेश परीक्षा निश्चित केली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणवत्तेवर प्रवेश प्रक्रिया राबविणे अयोग्य आहे. वैद्यकीय महाविद्यालये कमी असल्याने प्रवेश मिळविण्यासाठी अभ्यासातून विद्यार्थ्यांचा कस लागतो. बारावीच्या गुणांवर प्रवेशामुळे बाजारीकरणाचा धोका आहे.
- अन्वया पाध्ये
‘नीट’ रद्द निर्णय अयाेग्य
कोरोनामुळे यावर्षी बारावीची परीक्षा न घेताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश बारावीच्या गुणवत्तेवर देण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. तामिळनाडू विधानसभेत ‘नीट’ परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांवर प्रवेशाचे विधेयक संमत केले आहे. यापूर्वी तेलंगणा, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने पुन्हा निर्णय रद्द करून ‘नीट’ परीक्षेचा मार्ग अवलंबला आहे. बारावीची परीक्षा प्रत्यक्ष घेणे शक्य न झाल्याने मूल्यांकनाव्दारे निकाल घोषित करण्यात आला. त्यामुळे या गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चुकीचे ठरेल.
प्रवेश परीक्षा हव्याच
प्रत्येक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा निश्चित असून जबाबदारीही संस्थांकडे देण्यात आली आहे.
विशेष अभ्यासक्रमांसाठी जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस परीक्षेतून लागतो.
‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी दोन ते अडीच वर्षे विद्यार्थी अभ्यास करीत असतात. त्यामुळे प्रवेश परीक्षा गरजेचीच आहे.