पाचल येथील मनाेहर हरी खापणे महाविद्यालयात ‘नॅक मानांकनाच्या बदलाचे स्वरूप आणि प्रक्रिया’ विषयावर डाॅ. ए. एम. शेख यांनी मनाेगत व्यक्त केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाचल : नॅक मूल्यांकनाच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाताना नवीन तंत्र अंगीकृत करण्याची गरज असून या बदलाचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपण महाविद्यालयीन कामकाज केले पाहिजे. नॅक मूल्यांकनात अधिक प्रमाणात ऑनलाइन पद्धतीचा स्वीकार झाला आहे. परंपरागत नॅक मूल्यांकन पद्धती सध्या राहिली नसून या बदलाचे आपण स्वागत केले पाहिजे, असे मत प्रा. डॉ. ए. एम. शेख यांनी व्यक्त केले.
ते मनोहर हरी खापणे महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेत ‘नॅक मानांकनाच्या बदलाचे स्वरूप आणि प्रक्रिया’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, आय. क्यू. ए. सी. प्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांनी केले. या कार्यशाळेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग आपल्या नॅक मूल्यांकनाकरीता करून प्राध्यापकांनी नवे तंत्र अवगत करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले.
तृतीय सत्रात मूल्यांकनासाठीच्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तर चौथ्या सत्रात प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. आभार प्रा. एन. जी. देवन यांनी मानले.