सध्या प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. स्वत:बरोबरच आपल्या आप्तांचीही काळजी मनात घर करून आहे. दुसरा दिवस उजाडला की काही अशुभ वार्ता कानी पडू दे नको, असे भाकीत सारेच ईश्वराकडे करीत आहेत. अर्थात, गेल्या वेळेसारखी ही परिस्थितीही कालांतराने निवळेल. मात्र, यातून ‘आम्ही’ काय शिकलो, यापेक्षा यातून मी काय बोध घेतला, याचा विचार प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन करायला हवा. कारण आपल्या बेफिकिरीमुळे परिस्थिती भयावह झाली की मग आपण देवा यातून मला वाचव, अशी आळवणी करतो. ती वेळ निघून गेली मग ‘ये रे माझ्या मागल्या...’ उक्तीनुसार पुन्हा तोच बेजबाबदारपणा दाखवतो. त्यामुळे आपल्या या वृत्तीमुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. कोरोनाकाळात दोन वेळा याचा प्रत्यय आला आहे. ज्या देशांनी, राज्यांनी स्वयंशिस्त पाळली, त्यांना काेराेनाशी लढा देणे सोपे झाले. मात्र, बेशिस्तीमुळे काय होते, त्याचा अनुभव सध्या आपण घेतच आहोत.
आजची कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेरची झाली आहे. आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. आहे तेच डाॅक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी दोन - तीन शिफ्टमध्ये स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आपल्या कुटुंबाला विसरून लाेकांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत. प्रसंगी रुग्णांना खाऊपिऊ देत आहेत. सुविधा नाहीत, तिथे आपल्या वाहनातून उचलून नेत आहेत. अशा रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच हे स्वयंसेवक आज खऱ्या अर्थाने देवदूत बनले आहेत.
वाढती रुग्णसंख्या पाहता, रुग्णालये आणि त्यातील मनुष्यबळ कमी पडत आहे. एरव्ही प्रत्येक समाजाला त्यांची प्रार्थनास्थळे महत्त्वाची वाटतात. माणसांपेक्षा जात, धर्म महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे काही वेळा एकमेकांच्या जिवावर उठल्याच्या अनेक घटना वाचनात, टीव्हीवर पाहण्यात येतात. परंतु आज हे सगळं फोल ठरलं आहे. आज देव नाही तर देवासारखी माणसं मदतीला धावून येत असल्याने प्राण किती अनमोल असतो, याचा साक्षात्कार नव्याने व्हायला लागलाय. म्हणूनच आतातरी सर्वांनीच देवाच्या, जातीच्या नावाखाली समाजमंदिराचे राजकारण करत लोकांच्या मनात जातीयतेची विषवल्ली पसरविणाऱ्या राजकीय मंडळींचा कावा ओळखून त्यांना समाजमंदिरे उभारण्यापासून रोखून प्रत्येक गावामध्ये अद्ययावत असे रुग्णालय उभारून त्यात पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरावा. कारण यापुढे रुग्णालयेच कामी येणार आहेत. कोरोनाने हे अंजन डोळ्यात घातले आहे, एवढे नक्की.
डाॅ. गजनान पाटील