फुणगूस : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात कागदावरच राहिली आहे. जिल्ह्यात राजरोसपणे हिरव्यागार जंगलावर कुऱ्हाडीचे घाव घालून जंगलाचा सर्वनाश केला जात असून, याला आळा कोण घालणार, असा प्रश्न पर्यावरण विभाग तसेच निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.वृक्षतोडीच्या प्रमाणात तेवढीच झाडे लावण्यात यावीत, हा कागदावरचा नियम वाचून दाखविला जातो. मात्र, हे सर्व नियम थेट धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलात सापडणाऱ्या हिरडा, बेहडा, आवळा, कुडा, वावडींग, पांगार, जांभूळ, पळस, कळलावी, शेवर, बिब्बा, पोटदुखी आणि त्वचारोगासाठी तसेच महिलांच्या विविध आजारांसाठी उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती नष्ट होत आहेत. जंगलात राहणारी वानरे मानवी वस्तीमध्ये येऊन त्रास देत आहेत. वृक्षसंपदा कमी झाल्यामुळे यावर वास्तव्य करणारे पक्षी, किटक हे शेतपिकावर येतात. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.यापूर्वी, शेतकरी फक्त स्वत:च्या वापरासाठी अथवा आर्थिक अडचणीत स्वत:च्या मालकीची झाडे तोडायचा. परंतु, अलीकडे वृक्षतोडीमुळे पैसा मिळत असल्याने या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसागणीक १०० ते १२५ ट्रक लाकूड परजिल्ह््यात रवाना होत आहे. या प्रसंगी वृक्षसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक होऊन लढा देणे काळाची गरज बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १३ चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव वनविभाग असून, सुमारे ४९ चौरस किलोमीटर ‘अ’ वर्गीकृत तर एकूण ६४ किलोमीटर जंगल आहे. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसतात. तसेच जनजागृती केली जाते. वृक्षतोड थांबवण्यासाठी जनजागृतीची मोहीम का राबवण्यात येत नाही?, असा सवाल प्रभातफेऱ्या काढणाऱ्या तसेच सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. (वार्ताहर)
जंगले वाचवणे काळाची गरज
By admin | Published: February 13, 2015 9:09 PM