गुहागर / संकेत गोयथळे : तालुक्याला लाभलेले समुद्रकिनारे, पुरातन मंदिरे आदींमुळे पर्यटन वाढत आहे. तरीही या पर्यटनाला अनेक मर्यादा येत आहेत. तालुक्यात बारमाही पर्यटन होण्यासाठी पावसाळी पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. तालुक्यातील छाेटी-छाेटी धबधब्यांची ठिकाणे विकसित केली, तर पर्यटन व्यवसायात वाढ होऊ शकते.
तालुक्याचा विचार करता, तालुक्यात सवतसडा (ता. चिपळूण) आदींसारखा मोठा धबधबा नाही. मात्र, छोट्या नद्यांवर तसेच ग्रामपंचायतीने नद्यांवर बांधलेले बंधारे, छोटी धरणे आदीं ठिकाणांवर स्थानिक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात. तालुक्यात प्राधान्याने यासाठी वेलदूर येथील सिद्धेश्वर मंदिराशेजारील धबधबा सर्वपरिचित आहे. वेलदूर नवानगर ग्रामपंचायतीने पाणी पिण्यासाठी काँक्रिट भिंत बांधून अडवलेल्या पाण्यामुळे मोठे तळे निर्माण झाले आहे. या भिंतीवरून जाणाऱ्या पाण्यामध्ये अनेक स्थानिक पावसाळ्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेतात. अंजनवेल ग्रामपंचायतीने अशाच प्रकारे केलेल्या बंधाऱ्यावरील पाण्यात अनेक तालुकावासीय मौजमजा करण्यासाठी जातात. अशाचप्रकारे पानशेत पोमेंडी जंगल भागात नैसर्गिकरित्या नदीच्या पाण्याचे सर्वांना आकर्षण आहे. गुहागर शहरातील रेव्याची नदीसुद्धा यासाठी परिचित आहे.
तालुक्यात अशाचप्रकारे अनेक छोट्या-मोठ्या नद्या-नाले पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाही होतात. त्या परिसरातील लोक या पाण्याची मजा घेतात. तालुक्यात अद्यापही बारमाही पावसाळी पर्यटन रुजलेले नाही. इतरवेळी सुट्ट्यांमध्ये येणारे पर्यटक पावसाळ्यामध्ये तालुक्यात आल्यास येथील बारमाही पर्यटनाला चालना मिळू शकते.
----------------------------
ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
आजच्या स्थितीत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत नसले, तरी पुढील काळात याला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धबधब्यांवर जाण्यासाठी चांगला मार्ग व जंगलात असलेल्या ठिकाणांची माहिती देणारे मोठे फलक रस्त्यावर लावल्यास भविष्यात स्थानिकांसह मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. ही ठिकाणे विकसित झाल्यास त्याठिकाणी वडापाव, भेळ तसेच इतर खाद्यांचा छोट्या प्रमाणात व्यवसाय होतो. त्यामुळे पर्यटनाबराेबरच स्थानिकांना राेजगाराचीही संधी मिळू शकेल.