रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सव्वादोन लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी दीड लाख नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. अजूनही जवळपास आठ लाख नागरिक कोरोना लसीपासून वंचित आहेत. वाढता संसर्ग लक्षात घेऊन अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी लस पुरवठ्याबरोबरच केंद्रे वाढविण्याची मागणी होत आहे.
व्यापारी धास्तावले
चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने लॉकडाऊनचा कालावधी आणखी १५ दिवस वाढविण्याचे संकेत दिले आहेत. सध्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानेच सकाळी ४ तास सुरू आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढल्यास १५ दिवस पुन्हा दुकाने बंद राहणार असल्याने व्यापारी धास्तावले आहेत.
भात बियाणे उपलब्ध
चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामध्ये खरीप हंगामासाठी भात बियाणे उपलब्ध झाले आहे. विविध प्रकारच्या संकरित भात बियाणांची शहरातील पेठमाप गोदाम येथे विक्री सुरू करण्यात आली आहे. यात कर्जत २, जया, मसुरी, कर्जत ८, रत्नागिरी २४, आदी अनेक प्रकारच्या भात बियाणांचा समावेश आहे.
टँकरची मागणी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पुर्येतर्फे साखरपा गावातील गवळीवाडी व धनगरवाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्याने या वाडीतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
अन्नधान्यापासून वंचित
खेड : केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात आर्थिक दुर्बलांना मदत होण्यासाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, अजूनही गरजूंना या धान्याचा लाभ मिळालेला नाही. सध्या हे लाभार्थी या मोफत धान्याची प्रतीक्षा करीत आहेत.
हेल्मेटची सक्ती
चिपळूण : रत्नागिरीनंतर आता चिपळूण शहरातही दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची अंमलबजावणी कडकपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता चिपळूणकरांनाही हेल्मेटची सवय नित्याची करून घ्यावी लागली आहे.
दुकानदारांवर कारवाई
गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत नियम तोडून अत्यावश्यक सेवा वगळून सुरू असलेल्या ११ दुकानांवर कारवाई करीत येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अन्य दुकानदारांनाही चांगलाच चाप बसला आहे.
रुग्णवाहिका दुरुस्त
साखरपा : विच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जाणारी व्हॅन अचानक नादुरुस्त झाली. मात्र, साखरपा येथील श्रीधर कबनूरकर यांच्या मदतीमुळे उपलब्ध झालेल्या स्थानिक मेकॅनिकने अवघ्या १५ मिनिटांत रुग्णवाहिकेची दुरुस्ती केली. या रुग्णवाहिकेचे दिवे बिघडल्याने मार्गस्थ होण्यात अडथळा होत होता. मात्र, तो लगेचच दूर करण्यात आला.
मिरजोळेत कोविड सेंटर
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे आणि पंचक्रोशीतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने लोकनिधीतून कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या खाटा आणि बेडशिटस् याची उपलब्धता होण्यासाठी दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. साहित्य देणाऱ्यांनी पोलीस पाटील रजनिकांत पंडिये यांच्याकडे संपर्क करावा.
परिचारिका दिन साजरा
साखरपा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून कोरोनाकाळात लढा देणाऱ्या आरोग्यसेविकांचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. आरोग्य सहायक दत्तात्रय भस्मे यांनी जगातील पहिली नर्स फ्लोरेन्स नायटिंगेल यांची प्रतिमा आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी डॉ. पी. बी. अदाते, तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.