रत्नागिरी : वनौषधी वनस्पती संवर्धनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. लायन्स क्लब, रत्नागिरी आणि प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये यांचे संयुक्त विद्यमाने नारळ संशोधन केंद्रात मंगळवारी वनौषधी वनस्पती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
लायन्स क्लब, रत्नागिरीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच ॲड. शबाना वस्ता यांनी आपल्या टीमच्या सहकार्याने सेवाकार्याची सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून लायन्स डिस्ट्रिक्ट पर्यावरण चेअरमन एम. जे. एफ लायन डॉ. शेखर कोवळे आणि ॲड वस्ता ह्यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित केली होती. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. संतोष बेडेकर, उपाध्यक्ष डाॅ. शेखर कोवळे, ॲड. शबाना वस्ता यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. डॉ. कोवळे यांनी प्रस्तावनेत कार्यशाळेचे महत्त्व आणि गरज सांगितली.
प्रमुख पाहुणे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी वनस्पती संवर्धनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची गरज प्रतिपादन केली. डॉ. संतोष बेडेकर यांनी सरकारच्या आयुष कार्यक्रमाची माहिती दिली. तांत्रिक सत्रामध्ये डॉ. वैभव शिंदे यांनी वनौषधी वनस्पतींची माहिती देऊन त्यांचा कसा फायदा होऊ शकतो, हे उदाहरणांसह सांगितले. आपण स्वतः शेजारी असणाऱ्या ह्या संपत्तीचा फायदा न घेता बाजारातील प्रचंड महागडी औषधं आणि प्रसाधने वापरतो ह्यावर खेद व्यक्त केला. अनेक वनस्पतींची त्यांनी ओळख करून देताना नारळाचे औषधी गुणधर्म सहज सोप्या भाषेत सांगितले. संशोधन अधिकारी सुनील घवाळी यांनी तुम्ही वनस्पतीचे नाव सांगा मी त्याचे गुणधर्म सांगतो, असे आवाहन करून अनेक वनस्पतींची माहिती दिली. या कार्यशाळेमध्ये मधमाश्यांचे संगोपन या विषयावर डॉ. वानखडे यांनी मार्गदर्शन केले. संगोपन करण्यात येणारी मधमाशी ही डंख मारत नसल्याने ह्या जातीचे मधुमक्षिका पालन करणे कठीण नाही, अशी माहिती दिली.
या कार्यशाळेला लायन शामल सेठ, ॲड. कार्तिकी शिंदे, अन्य वकील, मत्स्य विद्यालयातील प्राध्यापक तसेच कोल्हापूर व सोलापूर येथून आलेल्या शेतकऱ्यांसह स्थानिक शेतकऱ्यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांना लायन्स क्लबतर्फे वनौषधी वनस्पती भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव अभिजित गोडबोले आणि खजिनदार गणेश धुरी यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन अभिजित गोडबोले यांनी केले.