दापाेली : कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीतर्फे गृह अलगीकरणात असणाऱ्या आणि रुग्णालयातील गरजूंना २८ एप्रिलपासून एक वेळचे अन्न माेफत घरपाेच देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या भीषण संकटामध्ये अनेक कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही जण गृहविलगीकरणात आहेत. यामध्ये वृद्ध महिला/जोडपे, हातावर पोट असणारे मजूर, घरी जेवण बनवू न शकणारे अशा अनेक गरजू लाेकांचा समावेश आहे. या गरजूंना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दापोलीतर्फे घेण्यात आला आहे. यासाठी एक दिवस आधी फोन करून, आपली नोंदणी करावी लागणार आहे. आजपासून नोंदणी आणि उद्यापासून प्रत्यक्ष सेवा कार्य सुरू होणार आहे. या महाकाय संकटात ‘सेवा है यज्ञकुंड, समिधा सम हम जले’ या उक्तीला अनुसरून प्रतिष्ठान आपल्या परिने सेवा कार्य उभे करून खारीचा वाटा उचलत असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर दीपक महाजन यांनी सांगितले.