अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये येथे नारळाच्या झाडावर चढण्याचे प्रशिक्षण आयाेजित केल्याचे आजीने ऐकले. तू या प्रशिक्षणाला जा, असे आजीने सांगितले. आजीच्या प्राेत्साहनामुळे ‘ती’ प्रशिक्षणाला गेली आणि माडाच्या झाडावर चढण्याचे कसब तिने आत्मसात केले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात नेहा चंद्रमाेहन पालेकर (रा. मावळंगे, पावस) हिने मुलगी असूनही आपले नाव केले आहे.
उंचच उंच माडावर चढून नारळ काढणे, नारळ साफ करणे, ही कामे पुरुषांचीच. स्त्रियांनी माडाच्या झाडावर चढून नारळ काढायचे म्हटले तरी ताे थट्टेचा विषय ठरु शकताे. मात्र, आजीच्या लाडात वाढलेल्या नेहाला आजीने यासाठी प्राेत्साहित केले आणि नेहाने झाडावर चढून नारळ काढण्यास सुरुवात केली. आज ती रत्नागिरी आणि पावस परिसरात अनेकांकडे नारळ काढण्यासाठी, नारळ साफ करण्यासाठी आणि नारळावर औषध टाकण्यासाठी जाते.
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथे नेहा आजी, वडील, काका - काकू आणि काकांच्या मुलासह राहाते. गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयात तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. रत्नागिरीतील टीआरपी येथे तिच्या काकांचा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायात ती काकांना मदत करते. त्यांची माडाची झाडे असून, या झाडांवर चढण्यासाठी माणसच मिळत नाहीत. त्यामुळे आजीने नेहाला प्रशिक्षणाला जाण्याचा सल्ला दिला.
प्रशिक्षणानंतर ती घरच्या माडावर चढून सराव करु लागली. हळूहळू ती निसर्गात रमू लागली. मुलगी नारळाच्या झाडावर चढते म्हणून जास्तीचे काैतुक झाले. त्यामुळे आवड निर्माण झाली. नारळ काढण्यापासून, झाडाची साफसफाई, औषधांची फवारणीही करु लागली. या कामासाठी तिला अनेकजण आता बाेलावतात. त्यातून तिचे अर्थार्जनही हाेत आहे. यासाठी तिला भाट्ये संशाेधन केंद्राचे केतन नाईक यांचे मार्गदर्शन मिळत आहे. नाेव्हेंबरमध्ये प्रशिक्षण घेतलेली नेहा आतापर्यंत जवळपास ५०० झाडांवर चढली आहे.
झाडावर चढता चढता राेगांची माहिती करुन घेतली. त्यावर औषध तयार करण्याचे तंत्र ती शिकली. आता ती स्वत: औषध तयार करते. आजीच्या पाठबळामुळे नेहा या कामात तरबेज झाली असून, निसर्गाच्या सान्निध्यात राहून अजून बरेच काही करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे.