लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे, चिपळूण) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
तालुक्यातील कादवड येथील जगन्नाथ बाबू चव्हाण (७०) हे आपला भाचा विनोद सकपाळ याच्याकडे कळकवणे येथे राहण्यासाठी गेले होते. यावेळी किरकाेळ कारणावरून विनोदने त्यांना मारहाण केली होती. त्याने हा प्रकार आपल्या मित्रालाही सांगितला होता. त्यानंतर त्याने २ जुलै २०१७ रोजी जगन्नाथ चव्हाण यांना पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने त्यांना रिक्षाने कादवड येथे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी अलोरे येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तसेच याप्रकरणी विनोद सकपाळ याचा मित्र, रिक्षा व्यावसायिक यांच्यासह बारा साक्षीदार होते. विनोद सकपाळ हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मुमीन यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावास होणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी मयत जगन्नाथ चव्हाण यांची बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जाधव यांनी काम पाहिले.
------------------------------
चिपळुणातील अतिरिक्त सत्र न्यायालयात पहिलीच शिक्षा
चिपळूण येथे अतिरिक्त सत्र न्यायालय मार्च २०२०मध्ये स्थापित झाले. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीमुळे न्यायालयाचे कामकाज बंद होते. अजूनही न्यायालय पूर्णवेळ सुरु नाही. हे न्यायालय येथे स्थापित झाल्यानंतरची ही पहिलीच शिक्षा आहे.
150721\1512-img-20210715-wa0004.jpg
मामाच्या खुनप्रकरणी भाच्याला जन्मठेप