रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या सी झ्र ४५२ या ५४ इंटरसेप्टर बोटींच्या मालिकेतील ५२ व्या बोटीचे अनावरण तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बडगोत्रा, पीटीएम, टीएम यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जयगड येथे झाले. यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांची प्रमुख उपस्थिती होती.अत्याधुनिक नेव्हीगेशन आणि संदेश सेंसर्स प्रणालीने युक्त अशा या बोटीत उष्णकटिबंदीय वातावरणात कार्यरत राहण्याची क्षमता आहे. ताशी ४५ नाविक मेल या वेगाने ही बोट समुद्रात संचार करू शकते. ही पूर्णत: भारतीय बनावटीची असून निर्मिती लार्सन व टुब्रो शिपयार्ड मर्यादित या कंपनीद्वारे सुरत येथे करण्यात आली आहे.
ही बोट २७ मीटर लांब असून, यामुळे १०५ टनचे विस्थापन होणार आहे. याची इंधन क्षमता ताशी २५ समुद्र मैल या वेगाने सुमारे ५०० समुद्र मैल असेल. या जहाजाची प्राथमिक भूमिका तस्करी प्रतिबंध, सागरी गस्त, शोध आणि बचाव यासारखी विविध कामे पार पाडणे ही असेल. या जहाजासाठी एक अधिकारी आणि १४ नाविकांची तुकडी तैनात असेल.तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यानंतर आयसीजीएस सी - ४५२ ही बोट जयगड येथे तैनात राहणार आहे. या बोटीच्या कमान अधिकारी पदाची जबाबदारी सहाय्यक कमांडंट अमोघ शुक्ला यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आयसीजीएस सी - ४५२ हे भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधीनस्त असलेले पाचवे जहाज असून या बनवटीचे हे तिसरे जहाज आहे. हे जहाज भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीची विविध कार्ये पार पाडण्याची क्षमता वाढविणार आहे. जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरित्या बेकायदेशीर कामे रोखण्यास ही बोट मदत करेल.