चिपळूण - चिपळुणात आलेल्या महापुरामुळे वाशिष्ठी नदीवरील जुन्या पुलाचा काही भाग ढासळला होता. त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या मार्गावरून सध्या वाहतूक सुरू असली तरी लवकरात लवकर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी होती. अखेर ४ सप्टेंबरपासून नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आदींनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून, मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरु करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेरीस त्याला यश आले असून, आज खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, शौकत मुकादम यांच्या उपस्थितीत या पुलाचा शुभारंभ करण्यात आला.