खेड : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे आणि राज ठाकरे यांच्या सभेचे लावलेले बॅनर काढण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वीच हे बॅनर हटविण्यात आल्याने खेडमध्ये मनसे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष पेटला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये रविवारी सभा आयाेजित करण्यात आली आहे. या सभेच्या निमित्ताने शिवसेनेकडून खेडमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आल्या आहेत. सभेची वातावरण निर्मिती केलेली असतानाच मनसेने गुढीपाडव्या शुभेच्छा देणारे बॅनर ठिकठिकाणी लावले आहेत. त्यातच शहरात ‘बाप माणूस’ नावाने लावण्यात आलेला बॅनर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपूर्वीच मनसेने शहरात लावलेले सर्व बॅनर हटविण्यात आले आहेत. हे बॅनर हटविण्यात आल्याने खेडमधील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सांगितले की, हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याचे बॅनर, राज ठाकरे यांच्या सभेचे बॅनर विराेधकांनी प्रशासनाला काढायला लावले. प्रशासनाची परवानगी घेऊनच हे बॅनर लावलेले हाेते. तरीही पाेलिस प्रशासनाला हाताशी धरून हे बॅनर काढण्यात आले. मनसेला संपविण्याचा प्रयत्न सातत्याने हाेत आहे. राज ठाकरे यांच्याकडे शिंदे गटाचे, भाजपचे लाेक जातात. चहा-पाणी घेतात, त्यांचे गाेडवे गातात. परंतु, त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्याला संपविण्याचे काम हे लाेक करतात. याबाबत राज ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून, त्यांनी यांना सूचना द्यावी. अन्यथा मनसेचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे.