जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या कसोटीचा कस लागत आहे. गेल्या सव्वा वर्षापासून आरोग्य यंत्रणेचा कोरोनाशी लढा सुरू असतानाच आता पुन्हा डेल्टा व्हेरिएंटचे तब्बल नऊ रुग्ण संगमेश्वर तालुक्यात नोंदविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करीत असताना आता संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
सुरुवातीला हे रुग्ण डेल्टा प्लसचे नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी रत्नागिरीत डेल्टा प्लसचे नऊ रुग्ण असल्याचा गाैप्यस्फोट केल्याने जिल्हा प्रशासन पेचात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये परदेशातून सुमारे ३० ते ३५ व्यक्ती दाखल झाल्या होत्या. ब्रिटनसारख्या देशात डेल्टा प्लसच्या व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे याच कालावधीत संगमेश्वर तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे प्रशासन दक्ष झाले. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने संगमेश्वर तालुक्यातील माभळे, धामणी, नावडी, कसबा, कोंडगाव ही पाच गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आली असून, सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या गावांवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर काँटॅक्ट ट्रेसिंगही वाढविण्यात आले आहे.
टेस्टिंगसाठी मनुष्यबळ कुठाय?
डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने अधिकाधिक कोरोना चाचण्या वाढविण्याभर भर देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. मात्र, चाचण्यांचे नियोजन करण्यात आले असले तरी आरोग्य यंत्रणेकडेच अपुरे मनुष्यबळ असल्याने चाचण्या कशा वाढविणार, ही समस्या उभी राहिली आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या नव्या डेल्टा प्लसच्या ९ रुग्णांपैकी आठ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याचबरोबर नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे.