रत्नागिरी : महावितरणकडून ग्राहकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत असतानाच जलद गतीने नवीन वीजजोडणी देण्यात आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१ ऑगस्ट ते दि.१५ सप्टेंबर अखेर दीड महिन्यात पाच हजार ३२६ ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या गतिमान सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरण व योजनांमध्ये नागरीकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभीकरण या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘ईज ऑफ लिव्हिंग’ नूसार ग्राहकाभिमुख प्रशासन राबविताना ग्राहकसेवा गतिमान करण्याची सूचना केली आहे. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता परेश भागवत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात एकूण तीन हजार ४२७ ग्राहकांना नवीन जोडण्यात देण्यात आल्या आहेत. त्यापैकी चिपळूण विभागात ८२९, खेड विभागात ८५६, रत्नागिरी विभागात एक हजार ७४२ ग्राहकांना नवीन वीज जोडण्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात एक हजार ८९९ ग्राहकांना वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कणकवली विभागात ९८१, कुडाळ विभागात ९१८ ग्राहकांच्या वीज जोडण्याचा समावेश आहे.अधीक्षक अभियंता श्री. स्वप्नील काटकर (रत्नागिरी), अधीक्षक अभियंता विनोद पाटील (सिंधुदुर्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी ग्राहक सेवेसाठी कार्यरत आहेत.