रत्नागिरी : जिल्ह्यातील १३७ माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू होणार आहे. ही सुविधा राबविणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा असून, राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग ठरणाऱ्या ई - लर्निंग प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात नवीन पर्व सुरू होणार आहे, असे उद्गार समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ई - लर्निंग प्रकल्प सादरीकरणाच्या प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात एकूण १७३ माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी पाचवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये ई - लर्निंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे. दहा शाळांमध्ये गतवर्षी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यात काही उर्दू शाळांंचाही समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्र्ण उपक्रमांतर्गत यासाठी १ कोटी ३४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, अध्ययन क्षमता वाढविणे, शाळांमधील शून्य पटसंख्या कमी करणे आदी मुख्य उद्देश असल्याचे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी प्रस्तावनेत सांगितले. यावेळी ई- लर्निंग सुविधा देणाऱ्या ओम इन्फोटेक कंपनीचे नीलेश साळुंखे आणि रोहित नागपुरे यांनी अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या या सुविधेत अनिमेटेड, प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून मुलांना शिकविण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरील (एमपीएस्सी) सुमारे १५००० प्रश्नांचा समावेश आहेहा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाळांनीदेखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे ते म्हणाले. सोमवार, २८ रोजी सकाळी १०.३० वाजता सावरकर नाट्यगृहात या सुविधेचे उदघाटन होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात येणार आहे. राज्याच्या युवा धोरणाच्या अंमलबजावणीचाही प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. (प्रतिनिधी)
शिक्षण क्षेत्रात ई-लर्निंगचे नवीन पर्व
By admin | Published: July 21, 2014 11:32 PM