रत्नागिरी : कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.मोठ्या शहरांप्रमाणेच आता कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुमजली इमारती उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तशा इमारती उभ्याही राहिल्या आहेत. मोठ्या शहरात बहुमजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास तत्काळ तेथील अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यारी यंत्रणा घटनास्थळी दाखल होते व आग आटोक्यात आणली जाते. रत्नागिरीतही आता ६ व ७ मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे. अशावेळी उभारण्यात आलेल्या अग्नीशमन केंद्राच्या उदघाटनाबाबत शासनाची मात्र उदासिनता दिसून येत आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुमजली इमारतींबाबत जर अशी दुर्घटना घडली तर येथे अशी यंत्रणा आधी नव्हती. त्यासाठीच नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना रत्नागिरीत ७७ गुंठे जागेत अत्याधुनिक अग्निशमन केंद्र अर्थात फायर स्टेशन उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मिळवून दिला होता. त्यातूनच हे अग्निशमन केंद्र रत्नागिरीत २०१६ साली पूर्ण करण्यात आले आहे. या केंद्राचे काम पूर्ण व्हावे, यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र केंद्र अत्याधुनिक असून दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ७ औद्योगिक वसाहती आहेत. त्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र येथे अस्तित्वात नव्हते. म्हणून हे केंद्र आता उभारण्यात आले आहे. या केंद्रात हायड्रॉलिक शिडियुक्त दोन अग्निशमन बंब, १ अधिकारी, १२ फायरमन व अन्य मिळून २६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे.
या केंद्राचा संपूर्ण कोकणला फायदा होणार आहे. ६ ते ७ मजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास या केंद्राची त्यात महत्वाची मदत होणार आहे. मात्र कर्मचारी नियुक्तीबाबत अद्यापही शासनाकडून कोणतीही हालचाल नसल्याने हे केंद्र सुरू होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.